Weather update : राज्यात मे महिन्याच्या तप्त उन्हात अचानक पावसाचा जोर वाढल्याने हवामानात प्रचंड बदल झाला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, उपनगरासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आता हवामान विभागाने आणखी गंभीर इशारा दिला असून पुढील ४८ तास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी धोक्याचे ठरणार आहेत. मुसळधार पावसासह गारपिटीचा अलर्ट दिला गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Weather update
‘यलो’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ – तुमचा जिल्हा कोणत्या यादीत?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील ११ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येथे ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असल्याने नागरिकांनी घरातच सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दुसरीकडे नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. येथे ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अति मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊ शकते.
हे पण वाचा | मान्सून अंदमानमध्ये वेळेआधीच पोहचला, महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट!
धुळे, जळगाव, नंदुरबारमध्येही पावसाचा शिडकावा
राज्यातील उत्तरेकडील धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. या भागांत ढगाळ वातावरण राहणार असून हवामानात गारवा निर्माण होईल.
गारपिटीचा धोका या जिल्ह्यांनी घ्यावी विशेष काळजी
विशेषत: अहिल्यानगर (नगर), पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा धोका हवामान विभागाने जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी खात्याकडूनही करण्यात येत आहे.
मान्सून लवकर दाखल होणार उष्णतेपासून सुटका लवकरच!
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता असून यंदा मान्सूनचे आगमन सामान्य वेळेपेक्षा आठवडाभर आधीच होणार आहे. मे महिन्याच्या शेवटीच केरळमध्ये मान्सून पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातदेखील जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार मान्सून सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोकणतल्या पावसामुळे शहरी भागात गारवा, पण…
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या भागांमध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार सरी आणि विजांचा कडकडाट झाल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. परिणामी या शहरांतील तापमानात घट झाली असून उष्म्याचा त्रास काहीसा कमी झाला आहे. मात्र, अचानक बदललेले हवामान आरोग्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.