Maharashtra Weather update : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या आभाळात काळे कुट ढग झालेत आणि पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचं स्पष्ट दिसतंय. पश्चिम राजस्थानातून मान्सून परत फिरायला लागलाय आणि त्याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रात जाणवतोय. खरं तर परतीचा पाऊस असतो तो शांत, तुरळक आणि हलका पण यंदा त्याने अचानक जोर धरलाय. रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर आजच थेट रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर अशा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. बाकी महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट आहे म्हणजेच पुढील काही दिवस जनजीवन विस्कळीत होणार हे नक्की. Maharashtra Weather update
सध्या राज्यभर पावसाने थैमान घातलाय, विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण पट्टीत तर रात्रभर पावसाचे तांडव सुरू आहे. नदी-नाले ओसंडून वाहू लागलेत, धरणातून विसर्ग वाढवावा लागतोय, रस्ते बंद पडतायत, शेतातलं पिक पाण्याखाली जातंय. खरंतर शेतकऱ्यांसाठी हा काळ अतिशय गंभीर आहे कारण खरीप हंगामाचं पीक उभं आहे आणि त्याच वेळी निसर्गाने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा मार सुरू केलाय.
भारतीय हवामान खात्याने (IMD Weather Alert) दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत. आज म्हणजे १५ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल आणि रात्रीपर्यंत मुसळधार हजेरी लावेल. विशेषतः रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पूरसदृश्य स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकण किनाऱ्यावर आधीच पाणी साचलं असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गावोगाव पूरस्थितीची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे.
हवामानशास्त्रज्ञ सांगतात की, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमध्ये मान्सून परतायला सुरुवात झाली आहे आणि विदर्भावर कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. याशिवाय बंगालच्या उपसागरावर तसेच अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. या दोन प्रणाली एकत्र आल्यामुळे राज्यात तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता प्रबळ आहे.
१६ सप्टेंबर रोजी रायगड, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात पावसाची मोठी हजेरी लागणार असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला गेलाय. विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली सोडल्यास उर्वरित जिल्हे पावसाने भिजणार आहेत. सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
१७ सप्टेंबर पासून विदर्भातील पावसाचा जोर काहीसा कमी होईल. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला गेलाय. बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत हलका पाऊस होईल अशी शक्यता आहे. उर्वरित मराठवाड्यात येलो अलर्ट सुरूच राहणार. कोकण पट्टीत मात्र जोरदार पावसाचा धोका कायम आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट आहे.
१८ सप्टेंबर रोजी रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
१९ सप्टेंबर ला मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरलेला दिसेल पण नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट आहे. बाकी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या चार दिवसांचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रासाठी मोठं संकट उभं आहे. आधीच पूरस्थिती, धरणं ओव्हरफ्लो, रस्ते खचलेली अवस्था, शाळा-बाजार बंद अशा समस्या आहेत. त्यात परतीचा पाऊस थैमान घालत असल्याने जनतेने खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनानेही नागरिकांना सतत आवाहन केलंय की, अनावश्यक बाहेर पडू नका, नदी-नाल्याच्या परिसरात फिरू नका, मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसारख्या शहरांमध्ये तर वाहतूक कोंडी, लोकलसेवेवर परिणाम, पाणी साचणे अशा समस्या आधीच सुरू झाल्यात.
यातच शेतकऱ्यांची सर्वाधिक धावपळ आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेलं सोयाबीन, भात पाण्याखाली गेलंय. ऊसाच्या शेतात पाणी साचल्याने तोटा होण्याची भीती आहे. ग्रामीण भागात नदी-नाल्याचं पाणी घरात घुसल्याने लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागलं. गेल्या काही दिवसांत शेकडो कुटुंबांना आपली घरं सोडून गावातील शाळा, मंदिरात आसरा घ्यावा लागलाय.
(Disclaimer: वरील हवामान अंदाज प्रसार माध्यमावर आधारे आणि हवामान खात्याच्या दिलेल्या अपडेट नुसार आहे, तरी आपल्या स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन सावध राहणे गरजेचे आहे.)